जागरूक ग्राहकांनी हक्क ओळखून फसवणुकीविरुद्ध आवाज उठवावा : महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनोद गायकवाड यांचे आवाहन

भेसळमुक्त भारत, फसवणूकमुक्त बाजारासाठी ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहन


भुसावळ (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून खरेदीच्या प्रत्येक व्यवहारात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन) यांच्या वतीने भेसळमुक्त भारत, फसवणूकमुक्त बाजार हा संकल्प पुढे ठेवण्यात आला असून, जागरूक ग्राहक हीच मजबूत समाजाची ओळख असा संदेश देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनोद गायकवाड यांनी कळवले आहे.

ग्राहकाला योग्य माहिती मिळण्याचा अधिकार
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकाला सुरक्षेचा अधिकार, माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, गार्‍हाणे ऐकले जाण्याचा अधिकार, दाद मागण्याचा (निवारणाचा) अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार असे सहा प्रमुख अधिकार आहेत. वस्तू किंवा सेवेमुळे जीवन अथवा मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, तसेच वस्तूची गुणवत्ता, प्रमाण, शुद्धता आणि किंमत याबाबत ग्राहकाला योग्य माहिती मिळणे हा त्याचा अधिकार आहे.

खरेदीपूर्वी माहिती तपासण्याचे आवाहन
ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना पक्के बिल किंवा पावती घेणे, पॅकेटवरील उत्पादनाची तारीख, वजन, एक्स्पायरी डेट आणि कमाल किरकोळ किंमत (चठझ) तपासणे आवश्यक आहे. भेसळ, कमी वजन किंवा निकृष्ट दर्जाची वस्तू आढळल्यास संबंधित विक्रेत्याकडे तक्रार करून त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना बळी पडू नका
दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना बळी न पडता ग्राहकांनी उत्पादन किंवा सेवेची आवश्यक माहिती पडताळून पाहावी. ऑनलाइन खरेदी करताना विश्वासार्ह संकेतस्थळांचा वापर करून सुरक्षित पेमेंट पद्धती निवडण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत तक्रारीची सुविधा
ग्राहकांच्या हिताचे आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अस्तित्वात आहे. खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेमध्ये त्रुटी आढळल्यास ग्राहकांना संबंधित ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते. यासाठी जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक आयोग अशा तीन स्तरांवर तक्रार निवारणाची व्यवस्था आहे.

नागरिकांनाही द्या आपल्या हक्काची माहिती
ग्राहकांनी केवळ स्वतः जागरूक न राहता आपल्या कुटुंबीयांना आणि परिसरातील नागरिकांनाही ग्राहक हक्कांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जागो ग्राहक जागो! भेसळीपासून वाचा, आपले अधिकार ओळखा आणि फसवणुकीविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद हिम्मतराव गायकवाड
(9923439949) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !