यावल तालुक्यात कोतवाल भरती प्रक्रियेला वेग : सोमवारी निघणार आरक्षण सोडत
पाडळसे, आमोदे, विरोदा, फैजपूरसह आठ गावांमध्ये जाहीर दवंडी देण्याचे तहसीलदारांचे आदेश
यावल (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील विविध गावांमधील रिक्त असलेली महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये तत्काळ दवंडी देऊन ग्रामस्थांना अवगत करण्याचे निर्देश यावल तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
सोमवारी आरक्षण सोडत
जळगाव जिल्हाधिकार्यांकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावल तालुक्यातील रिक्त कोतवाल पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. संबंधित गावांच्या (सजेतील) कोतवाल पदांचे आरक्षण बिंदूनामावलीनुसार निश्चित केले जाणार आहे. यासाठी सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता यावल तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या आरक्षण प्रक्रियेबाबत गावातील नागरिकांना पूर्वकल्पना मिळावी यासाठी पाडळसे, आमोदे, विरोदा, फैजपूर, मारुळ, मालोद, टाकरखेडा, पिंपरूड आणि दुसखेडे या गावांमध्ये आजच जाहीर दवंडी देण्याचे आदेश संबंधित ग्राममहसूल अधिकार्यांना (तलाठ्यांना) देण्यात आले आहेत.
दवंडी दिल्यानंतर त्याबाबतचा अहवाल दवंडी रजिस्टरच्या नकलेसह तत्काळ तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिल्या आहेत. कोतवाल भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्याने संबंधित गावांमधील इच्छुकांचे लक्ष आता 28 सप्टेंबर रोजी होणार्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.