थोरगव्हाणच्या डी.एस.देशमुख विद्यालयाचा योगीराज सपकाळे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
थोरगव्हाण, ता.रावेर (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : वेटलिफ्टिंग (भारोत्तोलन) हा केवळ शारीरिक शक्तीचा खेळ नसून तंत्रशुद्धता, संतुलन, चपळता आणि मानसिक एकाग्रतेची कसोटी पाहणारा क्रीडाप्रकार आहे. नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर खेळाडू या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करीत असतात. वेटलिफ्टिंग याच क्रीडाप्रकारात थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी खेळाडू योगीराज सपकाळे याने उल्लेखनीय यश मिळवले.
जळगावातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 17 वर्षे वयोगटातील 65 किलो वजन प्रकारात योगीराज सपकाळे याने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची पुढील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
योगीराजला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जे.ए.चौधरी तसेच सूर्या व्यायामशाळा, सावदा येथील व्यवस्थापक अविनाश महाजन यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
योगीराजच्या या यशाबद्दल दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, सर्व कार्यकारिणी सदस्य, देशमुख विद्यालय थोरगव्हाण मुख्याध्यापक डी.के.पाटील, ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे, सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पालक संघाने कौतुक करीत त्याला विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
