मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ : 16 हजार कोटींचे गुंतवणूक करार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती : महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार
मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करुय. यापुढेदेखील राज्यात येणार्या लहान-मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार, उद्योगपती ऑनलाईन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
देश-विदेशातील गुंतवणूकदारांसोबत करार
अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.


सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे
एक्सॉन मोबिल(अमेरिका) ऑइल अॅण्ड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी
हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार, असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी. वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी , हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार , असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार, इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500, इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500, रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी, युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000, ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042, वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षर्या करण्यात आल्या. मुकेश आघी व वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षर्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली. चीनचे भारतातील राजदूत वेडोंग सन, सिंगापुरचे वाणिज्यदूत गॅव्हीन चे , डेव्हिड यांनी देखील आपले विचार मांडले.