जळगावात प्रेमसंबंधाला विरोध : 35 वर्षीय तरुणीवर गोळीबार, दोघांना अटक
जळगाव (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : प्रेम संबंधाला विरोधाच्या कारणावरून जळगावात दसरा सणाच्या मध्यरात्री 35 वर्षीय तरुणीवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीतांना अटक करण्यात आली.
पाठलाग करून केला गोळीबार
दसरा सणाच्या मध्यरात्री 21 ऑक्टोबर रोजी सुमारे 12.30 वाजेच्या सुमारास पीडित तरुणी संगीता बुधा बारेला (35, जुने जळगाव) ही रोहन मधुकर सपकाळेसोबत दुचाकीवरून जुन्या बसस्थानकासमोरून जात असताना संशयीतांनी गोळीबार केल्याने तरुणी जखमी झाली व संशयीत दुचाकीवरून पसार झाले. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चार वर्षांच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाचा विरोध
प्राथमिक वृत्तानुसार, पीडित तरुणीचे पतीचे सुमारे 12 वर्षांपूर्वी निधन झाले असून, ती आपल्या दोन मुलांसह जळगावातील गोपाळपुरा परिसरात राहते. गेल्या चार वर्षांपासून तिचे रोहन मधुकर सपकाळेसोबत प्रेमसंबंध असून त्या विरोधातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गोळीबार प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
संगीता बारेला या रोहन सपकाळेसोबत दुचाकीवरून जुने जळगावातील बसस्थानकासमोरून जात असताना संशयीत अनिकेत मधुकर सपकाळे (26, सोनी नगर, जळगाव) व दीपक भरत धनगर (23, चौधरीवाडा, पिंप्राळा, जळगाव) यांनी अश्लील शिविगाळ करीत दोघांना ठार करण्याच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली. ही गोळी तरुणीच्या डाव्या पायाला लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ हलवण्यात आले. रुग्णालयातील जवाबावरून दोघा संशयीतांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सावित्री ढगे करीत आहेत.
