शहाद्यात कापसाआड फुलवली गांजा शेती : दोन कोटी 46 लाखांचा 492 किलो गांजा जप्त
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ : आरोपी पिंट्या वळवीविरोधात गुन्हा
शहादा (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कापसाच्या शेतात गांजा शेती फुलवण्यात आल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी केली. सटीपाणी गावाच्या शिवारातील कारवाईत पोलिसांनी तब्बल 492 किलो 661 ग्रॅम वजनाची व तब्बल दोन कोटी 46 लाख 31 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी पिंट्या रोहिदास वळवी (रा.घोटाळी, ता.शहादा, जि.नंदुरबार) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत सटीपाणी गावाच्या शिवारातील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना कल्पना देत पंच व यंत्रणेसह छापेमारी केली. पोलिसांच्या पथकाला यावेळी सटीपाणी गावाच्या शिवारातील एका शेतात कापूस पिकाआड गांजाची झाडे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ही गांजाची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन 492 किलो 661 ग्रॅम आहे तर त्याची अंदाजित किंमत दोन कोटी 46 लाख 31 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयित पिंट्या रोहिदास वळवी (रा.घोटाळी, ता.शहादा) विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, स्वप्नील गोसावी, जितेंद्र पाडवी, सुनील येवले, पोलीस अंमलदार शोएब शेख, मनोज महाजन, भरत उगले, रामेश्वर चव्हाण, रवींद्र अहिरे, सतीश घुले, विरेंद्र गावीत यांच्या पथकाने केली.
