गुरे चोरट्यांची टोळी पहूर पोलिसांच्या जाळ्यात
गोलाईत शिवारातून चोरलेली बैलजोडी जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पहूर, ता.जामनेर (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : पिंपळगाव गोलाईत शिवारातून बैलजोडी चोरीस गेल्यानंतर पहूर पोलिसांनी तपासादरम्यान चौकडीच्या मुसक्या आवळत बैलजोडी हस्तगत केली. आरोपींबाबत माहिती मिळताच तिघांच्या मुसक्या बांधण्यात आल्या तर चोरी केलेली बैलजोडी एकाला विकण्यात आल्याची माहिती मिळताच त्याच्याही मुसक्या बांधण्यात आल्या. बैलजोडीसह चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण उोनलाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
असे आहे चोरी प्रकरण
5 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान पिंपळगाव गोलाईत शिवारातील शेत गट क्रमांक 107 मधून फिर्यादी यांच्या मालकीची एक लाख पाच हजार रुपये किंमतीची दोन बैलांची जोडी चोरीस गेली. पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी तपासचक्रे फिरवली. संशयीत संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघेही रा.सोनाळा, ता.जामनेर) यांना ताब्यात बोलते करताच त्यांनी साथीदार दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची कबुली दिली.

शेतातून बैलजोडी जप्त
आरोपींनी चोरी केलेली बैलजोडी सुनसगाव येथील पिंटू नावाच्या व्यापार्याला विकल्याची माहितीही मिळताच पथकाने पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे (रा.सुनसगाव, ता.जामनेर) यांच्या शेतात पाहणी केली असता तेथे बैलजोडी आढळल्याने ती ताब्यात घेत मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. एक लाख पाच हजार रुपये किंमतीची बैलजोडी तसेच एक लाख 80 हजारांचा विना नंबरचा टेम्पो मिळून दोन लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत सोनवणे आदींनी केली. तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.
