भुसावळात मोबाईल चोरट्यांना बेड्या : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी
40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत : जुन्या पालिका कार्यालय परिसरात कारवाई
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2026) : चोरीला गेलेले मोबाईल विक्री करण्यासाठी चोरटे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी.पथकाने जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरात सापळा रचत दोघांना अटक केली. आरोपींकडून 20 हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल मिळून एकूण 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
शेख कैफ शेख जाबीर (रा.बहारे मदीना मशीदजवळ, भुसावळ) हे 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घरात झोपलेले असताना चोरट्याने त्यांच्या घरातून 20 हजार रुपये रोख, 12 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, आठ हजार रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल मिळून एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी 26 ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरात सापळा रचून मोहम्मद अझरुद्दीन शेख हमीद (19, रा.न्यू ईदगाहमागे, भुसावळ) आणि शेख मोहम्मद आरिफ नुरुल हसन (22, रा.अयान कॉलनी, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत 20 हजारांची रोकड तसेच 12 हजार रुपये किंमतीचा रेडमी मोबाईल, आठ हजार रुपये किंमतीचा व्हिवो मोबाईल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.