भुसावळात फटाके फोडणार्या पाच बुलेटचे सायलेन्सर जप्त
वाहतूक शाखेच्या कारवाईने खळबळ : 22 वाहनांवर दंडात्मक कारवाई
भुसावळ (बुधवार, 28 ऑक्टोबर 2026) : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि कर्णकर्कश आवाज करणार्या वाहनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी हंबर्डीकर चौक परिसरात धडक कारवाई केली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांनी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत फटाके फोडल्याप्रमाणे मोठा आवाज करणार्या पाच बुलेट मोटारसायकलींचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. संबंधित वाहनधारकांकडून आणि अन्य नियमभंग करणार्या वाहनचालकांकडून एकूण 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने शहरात खळबळ उडाली.
आवाज करणारे सायलेन्सर जप्त
शहरात काही दुचाकीस्वार मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहन चालवतात. अशा वाहनांमुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणातही भर पडते. विशेषतः बाजारपेठा, चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अशा वाहनांचा आवाज नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने हंबर्डीकर चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान फटाके फुटल्याप्रमाणे आवाज करणार्या पाच बुलेट मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनांवर प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच या वाहनांचे मोठा आवाज करणारे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. याशिवाय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या अन्य 17 वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पीएसआय खर्चाने, एएसआय वानखेडे, एचसी वानखेडे, एचसी विटकर, डब्ल्यूएचसी अहिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांचा समावेश होता.