अजित पवारांच्या विमान अपघातावर 14-15 नोव्हेंबरला रोहित पवारांचा मोठा खुलासा ; शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग


मुंबई (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तपासाच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या पत्रकार परिषदेत होणारा खुलासा आश्चर्यकारक असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

रोहित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
रोहित पवार यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले.









अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास अपेक्षित दिशेने आणि योग्य पद्धतीने होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. तपासाची गती संथ असून सत्ताधारी पक्षातील नेतेही उपस्थित शंकांचे निरसन करू शकलेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

राज्यातील नागरिकांमध्येही संभ्रम
राज्यातील अनेक नागरिकांच्या मनात या अपघाताबाबत संभ्रम असून ही केवळ दुर्घटना नसून घातपात असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात असल्याचे ते म्हणाले. एफआयआर दाखल करण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या घटनेला जबाबदार असणार्‍यांना कोण वाचवत आहे, असा सवालही त्यांनी केला.

14 किंवा 15 नोव्हेंबरला पत्रकार परिषद
या प्रकरणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आपण सविस्तर तयारी करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. दिवाळीनंतर 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे सादरीकरण केले जाणार आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे समोर आणले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही रोहित पवार यांनी भाष्य केले. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. विलीनीकरणाची चर्चा प्रत्यक्षात सुरू असती, तर आपल्याशीही संवाद साधण्यात आला असता. सध्या ही चर्चा प्रामुख्याने अजित पवार यांच्या पक्षात आणि माध्यमांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

रामदास कदमांना पुरावे सादर करण्याचे आवाहन
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा पुरावे सार्वजनिक करण्याचे आवाहन केले. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काही नेत्यांकडे वेगळी माहिती असेल, तर ती समोर आणावी त्यामुळे अजित पवार यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवरूनही सवाल
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या पूर्वीच्या भेटीवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. या भेटीचे चित्रीकरण करून व्हिडिओ बाहेर पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती की त्यामागे पक्षांतर्गत राजकारणाचा हेतू होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तटकरे आणि पटेल यांच्यावर पक्ष नियंत्रणाचा आरोप
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील पदे आणि नेतृत्वाच्या भूमिकेवरून हालचाली झाल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्रीपद किंवा अर्थमंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी पत्रकार परिषदेत कोणते पुरावे मांडले जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !