दिवाळीच्या रात्री रक्तरंजित थरार ! फटाक्यांवरून झालेल्या वादात 27 वर्षीय तरुणाची हत्या


नागपूर (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : दिवाळीच्या आनंदोत्सवाला नागपुरात रक्तरंजित वळण लागले. मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या तरुणांमध्ये फटाके फोडण्यावरून झालेला किरकोळ वाद जीवघेणा ठरला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अमन उर्फ बॉबी सुनील सपाटे (27) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाहनासमोर फटाके फोडण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, अमन हा मित्र प्रसाद राऊत याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही मित्रांसोबत देवनगर परिसरात आला होता. यावेळी देवनगर चौकात काही तरुण फटाके फोडत होते. त्याचदरम्यान वाहनासमोर फटाके फोडण्यावरून अमन आणि अक्षय मडावी यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.









चार जणांचा हल्ला ; उपचारापूर्वीच मृत्यू
वाद वाढल्यानंतर अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांनी अमनवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अमनच्या पोटावर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार
या प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय मडावी याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सुजल शेडाम आणि समीर कावळे यांचाही या प्रकरणातील सहभाग तपासला जात आहे. बजाजनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !