भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडून ‘वासुदेव नेत्रालया’च्या दुष्काळी उपक्रमाचे कौतुक !
वरणगाव (मंगळवार, 10 नोव्हेंबर 20526) : सध्या अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राजा मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत वरणगाव येथील ’वासुदेव नेत्रालय’ संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी बांधवांसाठी 1 नोव्हेंबर ते 30नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘मोफत चष्म्याचा नंबर काढून देण्याचा’ एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या लोककल्याणकारी उपक्रमाची प्रशासकीय पातळीवर दखल घेत भुसावळ विभागाचे प्रांत अधिकारी मा. जितेंद्र पाटील यांनी नुकतीच वासुदेव नेत्रालयाला प्रत्यक्ष भेट दिली.
प्रांतांनी केले उपक्रमाचे कौतुक
या सदिच्छा भेटीदरम्यान प्रांत अधिकार्यांनी नेत्रालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली आणि दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी राबवल्या जाणार्या या विशेष शिबिराची माहिती घेतली. ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणींमुळे स्वतःच्या आरोग्याकडे आणि विशेषतः डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. हीच मूक वेदना ओळखून नेत्रालयाच्या संचालिका डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नितु पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे प्रांत अधिकार्यांनी मनापासून कौतुक केले.








दुष्काळाच्या या कठीण काळात वरणगाव परिसरातील बळिराजाला आरोग्याचा असा मदतीचा हात देणे हे खरोखरच कौतुकास्पद आणि अत्यंत गरजेचे कार्य आहे, अशा शब्दांत मा. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी वासुदेव नेत्रालयाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले व नेत्रालयाच्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि सामाजिक कार्याला प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. नोव्हेंबर 2014 पासून अविरतपणे सामाजिक, धार्मिक आणि लोकहितार्थ उपक्रम राबवणार्या वासुदेव नेत्रालयाच्या या दुष्काळी शिबिराला प्रशासकीय अधिकार्यांच्या भेटीमुळे आणि कौतुकामुळे एक मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
हे शिबिर दररोज सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू असून (शनिवारी सुटी), जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.