अल्पवयीन तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार : पीडीता गर्भवती, मेहुणबारे पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा
मेहुणबारे, ता.चाळीसगाव (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील शेतमजुरी करणार्या कुटूंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर परिचीत असलेल्या तरुणाने लग्नाच्या आमिषाने सातत्याने अत्याचार केल्याने त्यातून ती गर्भवती राहिली. या प्रकरणी संजय (नाव, गाव पूर्ण माहित नाही) विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले तरुणीसोबत ?
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत मूळ गावी शेतमजुरीचे काम करीत होती. याच परिसरात शेतमजुरीसाठी येणार्या संशयित तरुणाची तिच्याशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी संशयिताने पीडितेला चॉकलेट खाण्यास दिले आणि शेजारील उसाच्या शेतात नेऊन तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले तसेच तिला आवडत असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.








त्यानंतर संबंधित ठिकाणी संशयिताने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पीडितेचे आई-वडील मजुरीच्या कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथे गेले होते. तेथे असताना 7 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर पुढील उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अत्याचाराची घटना मेहुणबारे हद्दीत घडल्याने पीडितेच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.