धरणगाव तालुका हादरला : कौटूंबिक वादातून आईलाच संपवले : नराधम मुलाला अटक
हनुमंतखेडे गावातील प्रकार : मारहाणीत गंभीर जखमी आईचा ओढवला मृत्यू
धरणगाव (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : अवघ्या 24 तासांपूर्वीच जळगावनजीक खुनाची घटना ताजी असतानाच धरणगाव तालुक्यातून पुन्हा खुनाचा प्रकार समोर आला आहे. कौटूंबिक वादातून नराधम असलेल्या मुलाने आपल्या आईलाच बेदम मारहाण केली व या मारहाणीत आईचा मृत्यू ओढवला. ही घअना हनुमंतखेडा येथे मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी घडली. शरीफाबी रसूल पटेल (65, रा. हनुमंतखेडा) असे मृताचे तर रशीद रसूल पटेल (55) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आजारी आईला संपवले
मृत शरीफाबी पटेल या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने घरीच होत्या व त्यांचा मुलगा रशीद पटेल हादेखील कुठलेही काम करीत नसल्याने कुटूंबात वाद होत होते. मंगळवार, 10 रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास माय-लेकात कौटुंबिक कारणावरून वाद झाल्यानंतर संशयीत रशीदने आईला बेदम मारहाण केली व त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.








संशय येताच पोलिसांना दिली ामहिती
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास संशयीत रशीद अचानक घराबाहेर आला व शेजार्यांना माझी आई खाली पडल्याची त्याने बतावणी केली व शेजार्यांनी धाव घेऊन आत घरात पाहिले असता, शरीफाबी या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या आढळल्या. घटनेची तीव्रता लक्षात घेता ग्रामस्थांनी त्वरित पोलीस पाटील सुनील सोनवणे यांना संपर्क साधून माहिती दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तत्काळ धरणगाव पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) रवाना करण्यात आला. दरम्यान, संशयीत रशीद पटेल याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची व विसंगत उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावताच त्यास ताब्यात घेण्यात आले व नंतर खुनाचा उलगडा झाला.