चोपडा तालुक्यात गांजाची मोठी शेती उघड ; चार कोटी 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई : संशयीत झाला पसार
चोपडा (बुधवार, 11 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ंअमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे घबाड समोर आले आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल 1 हजार 870 किलो गांजासदृश्य अंमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत प्रति किलो 25 हजार रुपये याप्रमाणे तब्बल चार कोटी 67 लाख 50 हजार रुपये असल्याचे नोंदीत नमूद आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी जुम्मा आरसी पावरा हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
वनक्षेत्रातील गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश
पोलीस नोंदीतील माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खार्या पाडाव परिसरातील वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 240 मध्ये गांजासदृश्य अंमली पदार्थाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली. संशयित जुम्मा आरसी पावरा (खार्यापाडाव) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड व विक्री करण्याच्या उद्देशाने ही शेती कसल्याचा प्रकार समोर आला आहे.








पोलिसांच्या धाडीनंतर संशयीत पसार
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गांजाची झाडे, पाने व फांद्या असलेला अंमली पदार्थ ताब्यात घेतला. जप्त केलेल्या मालाचे एकूण वजन एक हजार 870 किलो असल्याची नोंद असून, त्याचे बाजारमूल्य चार कोटी 67 लाख 50 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(अ), 22 व 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा 10 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री नोंदविण्यात आला. संशयित आरोपी जुम्मा आरसी पावरा (खा-यापाडाव, ता. चोपडा, जि. जळगाव) हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. वनक्षेत्रात गांजाची लागवड करून अमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.