टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात 13 जणांना अटक ; मास्टर माईंडपर्यंत पोहोचणार : मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा


मुंबई (बुधवार, 11 नोव्हेंबर 2026) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास करत मुंबई पोलिसांनी देशाच्या विविध भागांतून आतापर्यंत 13 संशयितांना अटक केली आहे. या धडक कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले असून, केवळ हल्लेखोरांनाच नव्हे, तर त्यांना रसद पुरवणारे सूत्रधार आणि आश्रयदाते यांनाही शोधून काढणार असल्याचा ठाम इशारा दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी (10 नोव्हेंबर) आपल्या शासकीय निवासस्थानी ’वर्षा’ येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बॉलिवूड कलाकारांना मिळणार्‍या धमक्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका स्पष्ट केली.

पडद्यामागील सूत्रधारही पोलिसांच्या रडारवर
फडणवीस म्हणाले की, आरोपींनी पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, मुंबई पोलिसांनी विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या संशयितांना अटक झाली असली, तरी संपूर्ण नेटवर्कचे मुख्य सूत्रधार महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेरही असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केंद्र सरकार तसेच संबंधित राज्यांच्या पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. धमक्या देणारे गुन्हेगार, त्यांना आदेश देणारे मास्टरमाइंड आणि त्यांना आश्रय देणारे सर्वजण तपासाच्या कक्षेत असतील. धमक्यांच्या माध्यमातून मुंबईचे वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.








मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास
मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक असून, संघटित गुन्हेगारीला कसे प्रत्युत्तर द्यायचे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या प्रकरणातील उर्वरित आरोपी आणि मुख्य सूत्रधारांपर्यंतही पोलीस लवकरच पोहोचतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

18 ऑक्टोबरला जुहूमध्ये झाला होता गोळीबार
टायगर श्रॉफ यांच्या कारवर 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला होता. ते फुटबॉल ग्राउंडवरून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला लक्ष्य केले. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित बचावले; मात्र त्यांचा चालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते.

घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत विविध राज्यांमध्ये कारवाई केली आणि आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.

बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबारानंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. तपासादरम्यान अक्षय कुमार यांच्यासह काही बड्या कलाकारांच्या घरांची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, अमिताभ बच्चन यांच्या ’जलसा’ निवासस्थानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मुंबईच्या महापौर ऋतु यांना मिळाल्याचे वृत्त होते. अलीकडेच आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही कोट्यवधी रुपयांची मागणी करत धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे.

सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची डव्हायजरी
या पार्श्वभूमीवर 10 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्याचे आयएएनएसच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कलाकारांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अ‍ॅडव्हायजरीतील प्रमुख सूचना :

गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.

अनोळखी आणि गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगावी.

सार्वजनिक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.

मोठ्या कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त सुरक्षा खबरदारी घ्यावी.

वैयक्तिक सुरक्षा पथक आणि पोलिसांशी नियमित संपर्क ठेवावा.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !