वडेट्टीवारांचा शरद पवार गटावर हल्लाबोल; ‘बाप-लेकांनी घरातच घेतला सत्तेत जाण्याचा निर्णय’


मुंबई (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार गटाचा सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय आधीच निश्चित झाला होता. हा निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रीने घरातच घेतल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सुप्रिया सुळे यांना सत्तेत सहभागी होऊन मंत्री व्हायचे असल्याचा दावाही त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांचा राजकीय प्रवास आपण जवळून पाहिला आहे. त्या भाजपच्या विमानातून फिरल्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चार-पाच वेळा भेट घेतली, तरी काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, त्याचवेळी त्यांना सत्तेत सहभागी होण्याची आणि मंत्री होण्याची इच्छा असल्याचे लक्षात आले होते. या नेत्यांकडे आता विचारधारा उरलेली नसून केवळ सत्तेसाठी राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार की सुप्रिया सुळे निर्णय घेतात, या प्रश्नावरही दोघे मिळूनच निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले.

रोहित पवारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास सकारात्मकता
आमदार रोहित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यास काँग्रेस त्यांचे स्वागत करेल का, या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार घेऊन पुढे येणार्‍या प्रत्येकासोबत काँग्रेस राहील. रोहित पवार यांचे पक्षात 100 टक्के स्वागत केले जाईल. मात्र, पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेत असते. हायकमांडने निर्णय घेतल्यास राज्य काँग्रेसकडून विरोध होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या जागेवरून भावनिक दबावाचा आरोप
काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडे 36 आमदारांचे संख्याबळ असताना केवळ 10 आमदार असलेल्या शरद पवार गटाला राज्यसभेची जागा देण्याच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास निर्माण झाला होता. तसेच, 85 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात संधी मिळावी, अशी भावनिक भूमिका मांडण्यात आली. यातून काही प्रमाणात ’इमोशनल ब्लॅकमेल’ करण्याचाही प्रयत्न झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

2029 मध्ये जनतेचा उद्रेक होईल
इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या मतभेदांवर बोलताना वडेट्टीवार यांनी सत्तेचा लोभ आणि पैशासाठी राजकीय समीकरणे बदलली जात असल्याचा आरोप केला. आज कोणताही पक्ष कुठेही गेला, तरी 2029 मध्ये जनतेचा उद्रेक निश्चित असल्याचे ते म्हणाले. देशात अराजकता निर्माण झाल्यास जनता संबंधित नेत्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गट अनुपस्थित राहण्याची चर्चा असून या घडामोडींमुळे हा गट सत्ताधारी पक्षाच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !