भुसावळात तोतया पोलिसांनी वृद्धाला गंडवले : 14 ग्रॅमच्या अंगठीसह चैन लांबवली


भुसावळ (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी भामट्यांनी एका 65 वर्षीय वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्याच्या अंगावरील सोन्याची चेन आणि अंगठी चलाखीने काढून घेतल्याची घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस असल्याची बतावणी
रवींद्र गोविंदा बारी (65, रा.लक्ष्मीनगर, वांजोळा रोड, भुसावळ) हे गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजेच्या सुमारास वसंत टॉकीजजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला विश्वासात घेतले व बोलण्यात गुंतवून वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यास सांगत फसवणूक केली. या प्रकारात भामट्यांनी 9 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत अंदाजे 45 हजार रुपये) तसेच पाच ग्रॅम वजनाची बदामाच्या चिन्हाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 25 हजार रुपये) मिळून एकूण 70 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.

या प्रकरणी रवींद्र बारी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन नायमाने करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !