वंदे भारत अभियान : मुंबईत 28 हजार 435 प्रवासी दाखल
15 जुलै पर्यंत आणखी 40 विमानांनी येणार प्रवासी
मुंबई : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरीकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन कारण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून सातत्यपूर्ण रीतीने सुरुच असून आतापर्यंत 182 विमानांनी 28 हजार 435 नागरीक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10 हजार 347 आहे. उर्वरीत महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या नऊ हजार 752 आहे तर इतर राज्यातील आठ हजार 336 प्रवासी ही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यात 15 जुलै 2020 पर्यंत आणखी 40 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरीकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना कॉरंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
या देशातून आले प्रवासी
प्रवासी विविध देशातून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरीका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया,मादागास्कर, नायजेरिया,ऑस्ट्रेलिया,न्युझिलंड,सौदी अरेबिया, कॅनडा, पुर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन या देशांचा समावेश आहे. बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

