भुसावळातील वीज ग्राहकांना दिलासा : हजारो रुपयांची वीज बिले दुरुस्त
संचारबंदी शिथिल झाल्यावर व्यापार्यांनी संपर्क साधण्याचे प्रा.धीरज पाटील यांचे आवाहन
भुसावळ : लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता मात्र वीज कंपनीने वीज ग्राहकांना रीडींग कळवण्याचे आवाहन करूनही काही वीज ग्राहकांपर्यंत संदेश न पोहोचल्याने त्यांना सरासरी वीज बिले देण्यात आले. या संदर्भात शिवसेनेदेखील आवाज उठवला होता. त्यानुषंगाने शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व महावितरणचे अधिकारी यांनी गुगल मीटच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने सोडवल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीज ग्राहकांना मोठा दिलासा
प्रत्यक्षात वीज वापरली नसताना वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप ग्राहकांना केला होता तर 22 मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रीडींग घेवून वीज वितरण कंपनीला कळवावेख असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रीडींग घ्यायचे कसे ? याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले. जे बिल 500 ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना चार ते पाच हजारांच्या घरात मिळाले. शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील यांनी ग्राहकांच्या वतीने तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक यांच्याशी थेट चर्चा करीत अनेक ग्राहकांची देयके दुरुस्त करण्यात आली. श्रीनगर येथील अनिल गोविंदा लोखंडे यांचे आठ हजार 400 रुपये तर भुसावळ हायस्कूलजवळील नीरज तिवारी यांचे सहा हजार 289, मंगल पाटील यांचे तीन हजार 217 अशी रक्कम बिलातून कमी करून दुरुस्त करण्यात आली. गणेश कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, हुडको कॉलनी, अयोध्या नगर व भोईनगर परिसरातील ग्राहकांच्या तक्रारीसुद्धा मांडणार असून प्रत्येक ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न असेल, असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.
संचारबंदीनंतर व्यापार्यांनी संपर्क साधावा
स्थिर आकार माफ करण्याची मागणी शिवसेनेने केली होती त्यामुळे तीन महिन्यात प्रत्येक व्यावसायिकांना एक हजार 209 रुपयांचा फायदा झाला मात्र कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद असल्याने हे बिल कोठून भरायचे? असा प्रश्न व्यापार्यांना पडला आहे. व्यापार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रत्यनशील राहील म्हणून व्यापार्यांनी शहरातील संचारबंदी शिथील झाल्यावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.

