यावलमधील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जा


नगरसेवक कुंदन फेगडे यांचा वीज कंपनीला इशारा : माजी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार

यावल : यावल शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असल्याने तसेच वीज वितरण कंपनी यावल येथील उपकार्यकारी अभियंता वीजपुरवठा सुरळीत करण्यात निष्क्रिय ठरत असल्याने यावल नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी यावलकरांच्या संतप्त भावना लक्षात घेता बुधवार, 8 रोजी वीजल कंपनी उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन वीजपुरवठा तत्काळ नियमित आणि सुरळीत करणेबाबत निवेदन दिले आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे.

विजेच्या लपंडावाने नागरीक संतप्त
गेल्या पंधरा-वीस दिवसापासून यावल शहरात दिवसा व रात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण यावलकर संतप्त झाले आहेत. यावल शहरात विजेचा लपंडाव सुरूच ग्राहकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. या संदर्भात यावलचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी बुधवारी वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. गेल्या 15 दिवसांपासून यावल शहरात वीजपुरवठा दिवसा आणि रात्री शेकडो वेळेत खंडित होत असून दाब (व्होल्टेज) देखील कमी-जास्त होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. .जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता आपण यावर त्वरीत तोडगा काढावा आणि आपल्या समोर फारच मोठा प्रश्न असल्यास आपण पत्रकार परिषद घेऊन यावल शहरातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करावा शिवाय नागरीकांना अवाच्या-सव्वा लाईट बिले आल्याने उपाययोजना कराव्यात अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

…तर तीव्र आंदोलन
मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही डॉ.फेगडे यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत माहितीस्तव विधान परीषद विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाईन पाठवण्यात आली आहे. दरम्यान, वीज कंपनीच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. निवेदनावर नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांच्यासह स्नेहल फिरके, भूषण फेगडे, रीरतेश बारी, मनोज बारी, उज्वल करांडे, निर्मल चोपडे, विजय महाजन, लिलाधर कारे आदींच्या सह्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !