भुसावळात दिड लाखांच्या चोरीने खळबळ
भुसावळ : मोकळ्या जागेत राहणार्या कुटुंबियांच्या पेटीतील सुमारे दिड लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना गुरुवारी शहरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात पु.ओ.नाहाटा महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेवर राहत असलेल्या रामसिंग गोपाळ सिंग चितोडिया यांनी पालमध्ये असलेल्या पेटीत सुमारे दीड लाखांचे दागिने ठेवले असता चोरट्यांनी ते लांबवले. चितोडीया यांचा जडीबुटी विकण्याचा व्यवसाय असून ते त्यांच्या झोपडीवजा घरातील पेटीत एक लाख 52 हजार 500 रुपये सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी ते चितोडीया हे झोपेत असताना लांबवले. शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

