बोदवड तालुक्यातील शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी
शिवसेनेच्या वतीने बोदवड तहसीलदारांना निवेदन
बोदवड : तालुक्यातील जवळपास एक हजार 700 शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2019 मध्ये सहभागी होऊन अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया लि.मुंबई या कंपनीचा पीक विमा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने घेतलेला आहे. गतवर्षी 2019-20 या कृषी वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या अतिपावसाने हातात तोंडाशी आलेले संपूर्ण पीक पूर्णतः खराब झालेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात शेती पिकांचा पंचनामा करण्यात आला व सरासरी 80 ते 90 टक्के नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले. ज्या शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा घेतला असून त्वरीत पीक विम्याची संरक्षित रक्कम पीक विमा कंपनीकडून लवकरात लवकर देण्यात येईल, असे सांगण्यात आले मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून
पीक विम्याची रक्कम कंपणीकडून देण्यात आलेली नाही.
पीक विमा कंपनीकडून शेतकर्यांची फसवणूक
शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी कंपनीचे प्रतिनीधी यांच्या संपर्कात राहुन पीक विमा रक्कम मिळण्याबाबत विचारणा केली मात्र त्यांच्याकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या मात्र 30 जुनपर्यंत सर्व शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार, असे सांगुन वेळ मारून नेण्यात आली मात्र प्रत्यक्षात विम्याची रक्कम मिळालेली नाही. 15 जुलैपर्यंत पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपणी इंडिया लि.मुंबई यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, अल्प.जि.संघटक कलिम शेख, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, भास्कर गुरचळ, अमोल देशमुख, कैलास सूर्यवंशी, गोपाळ पाटील, पंकज वाघ, धनराज सुतार, बंटी पाटील, सागर काकडे, नईम बागवान, समाधान माळी, रुपेश बडगुजर आदींची उपस्थिती होती.

