जळगाव मुख्यालयातील मद्यधूंद पोलिसांकडून जि.प.गटनेत्यांना मारहाणीचा प्रयत्न


यावल शहरातील धक्कादायक घटना : दोघा पोलिसांना अटक : फिर्याद मागे घेण्यासाठीदेखील केली दमबाजी

यावल : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जि.प.जळगांव गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे जळगाव मुख्यालयातील दोघा मद्यधूंद पोलिसांनी वाहन अडवत त्यांना मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर शुक्रवारी रात्री आठ वाजता घडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र रोहिदास पांडव व हेमंत प्रमोद सोळुंके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्याद मागे घेण्यासाठीदेखील केली दमबाजी
शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गटनेता प्रभाकर सोनवणे हे आपल्या इनोव्हा वाहनाने (एम.एच. 19 ए. डब्ल्यू. 3434) यावल शहरातून वढोदे या आपल्या गावी जात असताना यावलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने हुंडाई इवॉन कार (क्रमांक एम.एच.19 बी.यू.0260) ने सोनवणे यांच्या कारला कट मारून गाडी पुढे नेत गाडीतून काठी उगारत चालक सुनील बिरारी आणि प्रभाकर आप्पा सोनवणे यांना धमकावत शिवीगाळ केली. सोनवणे यांनी त्यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केला परंतु दोघे पोलिस दारूच्या नशेत तर्रर्र असल्याने त्यांनी सोनवणे यांना दमदाटी आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता कदीर खान करीम खान व अनिल जंजाळे यांनी काठी पकडल्यानंतर संबंधितानी आम्ही पोलिस असल्याचे धमकावले. यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले असता या मद्यधूंद पोलिसांनी तेथेही दमबाजी करीत फिर्याद मागे घ्या अन्यथा पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी चालक सुनील सुधाकर बिरारी (सरस्वती शाळेजवळ, यावल) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !