राजगृहावरील हल्ल्याचा सावदा शहरात निषेध
दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत सावदा पोलिसांना निवेदन
सावदा : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानावर मनोविकृतांनी हल्ला करून तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचा शहरात निषेध करण्यात आला. समाज विघातक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारने शोध घेवून कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध पंच बहुउद्देश्यीय मंडळ व समाजाच्या वतीने सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन देवून करण्यात आली.
भ्याड हल्ला करणार्यांवर कारवाईची मागणी
निवेदनाचा आशय असा की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरीकांच्या मनात खोलवर रुजले असून कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सुकदेव तायडे, प्रकाश लोखंडे, भीमराव लोखंडे, अशोक बड़गे, देविदास लोखंडे, सतीश लोखंडे, नीरज सोनवणे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी व उपस्थित होते.

