भुसावळ गोळीबार प्रकरण : सातवा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील रेल्वे हॉस्पिटलसमोरील कब्रस्तानात आदित्य लोखंडे या युवकावर गुरुवारी रात्री गोळीबार करून मारहाण करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी रविवारी या गुन्ह्याील सातवा संशयीत राहुल धम्मपाल सुरवाडे (रा. लाल जैन मंदीरा जवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली होती. यात आतिष खरात, हंसराज खरात, चिन्ना, सुरज, कपिल कासे व नगरसेवक राजकुमार खरात या संशयितांचा समावेश होता. या घटनेत संशयितांनी वापरलेली पिस्तूल कुठून आणली, याचा पोलिस शोध घेत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी व डीबी पथकातील पोलिस कर्मचारी तपास करत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे. तसेच या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे. आणखी काही संशयितांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

