रावेर शहरात 56 बेडचे ऑक्सीजन सेंटर सुरू


आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते झाले उद्घाटन : हाय रीक्स कोरोनाबाधीतांवर रावेर शहरातच होणार उपचार

रावेर : हायरीक्स कोरोना बाधीत रुग्णांवर उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात 56 बेडचे ऑक्सिजन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. शनिवारपासून या सेंटरमध्ये हाय रीक्स बाधीतांवर येथे उपचार होणार आहे. या ऑक्सिजन सेंटरचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. रावेरला ऑक्सिजन सेंटर नसल्याने हाय-रीक्स कोरोनाबाधीत रुग्णांना उपचारासाठी जळगाव किंवा भुसावळ येथे हलवावे लागत होते. ऑक्सीजन उशिरा मिळाले म्हणून काही बाधीतांचा मृत्यूही ओढवला होता. या गंभीर बाबीची दखल प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लोकवगणीतून तब्बल 56 बेडचे सुसज्ज ऑक्सीजन सेंटर रावेर ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित केले आहे. ऑक्सिजनची कमतरता भासणार्‍या रुग्णांवर आता जळगाव वा भुसावळऐवजी रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार होणार आहेत.

यावल-न्हावीत सुध्दा लवकरच ऑक्सीजन सेंटर
रावेर नंतर यावल व न्हावीत ऑक्सिजन सेंटर उभारण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यात एकूण 128 कोरोनाबाधीतांवर उपचार सुरू असून तब्बल 672 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत तसेच ऑक्सीजनअभावी आता जळगाव जाण्याची गरज नाही त्यांच्यावर रावेरमध्येच ऑक्सिजन सेंटरमध्ये उपचार केले जातील. यासाठी दोन शिप्टमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. नागरीकांनीदेखील कोरोनाची लक्षणे जाणवल्यास बाहेर येण्याचे आवाहन प्रांताधिकारी अजीत थोरबोले यांनी केले आहे.

यांची होती उपस्थिती
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, डॉ.एन.डी.महाजन, नायब तहसीलदार संजय तायडे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक आसीफ मेंबर, सुनील कोंडे, सरपंच श्रीकांत महाजन, राहुल पाटील, गणेश महाजन, भास्कर महाजन, अतुलशेठ अग्रवाल, महेमूद शेख यांच्यासह ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी मदत करणारे वेग-वेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनासोबत दानशुरांचाही मोठा सहभाग : तहसीलदार
अनपेक्षित कोरोना महामारी आपल्याकडे आल्यानंतर प्रशासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला शिवाय लॉकडाऊनच्या काळात सात हजार किराणा किट्स आम्ही तालुक्यात वाटले. यासाठी दानशूरांचेही सहकार्य लाभले. कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभाण्यात आले असून बेड पलंगासह इतर सोई-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या शिवाय तालुक्यातून शासनाला मदत व्हावी म्हणून पीएम व सीम फंडाला सहा लाख तर मास्क न बांधलेल्यांकडून चार लाख 14 हजार दंड स्वरुपात वसूल केलेला निधी सीएम फंडला देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी व्यापारी, सरपंच, स्वस्त धान्य दुकाने, लोकप्रतिनिधी आदी दानशुरांचे आभारी असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे म्हणाल्या.

शिल्लक निधीतून इतर सुविधा देणार
ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी शिल्लक असलेला निधीतून रावेर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथे गरम पाणीचे हिटर लावले जातील पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !