भुसावळात आठवड्यातून आता दोन दिवस जनता कर्फ्यू


शनिवारसह मंगळवारी शहरातील दुकाने राहणार बंद ः कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी व्यापार्‍यांचा पुढाकार

भुसावळ : शहरात कोरोनाबाधीतांची सातत्याने आकडेवारी पाहता कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून शनिवारी व मंगळवारी दोन दिवस शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी, प्रशासन व व्यापार्‍यांच्या बैठकीत शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी
रामसिंग सुलाणे होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपजिल्हाधिकारी
किरण सावंत-पाटील, तहसीलदार दीपक धीवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून शहरातील व्यापार्‍यांनीही त्यास साथ देण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने आठवड्यातील शनिवार व मंगळवारी जनता कर्फ्यू बंद पाळण्यात येईल. या दिवशी सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्यात येतील मात्र अत्यावश्यक सेवेत येणारी दुध डेअरी, दवाखाने आणि औषध दुकाने उघडी राहणार आहे. दुध डेअरी सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते 7 या वेळात उघडी ठेवता येणार आहे.

मास्क न लावणारे रडारवर
शहरात एकीकडे कोरोनाचा फैलाव वाढत असताना दुसरीकडे काही नागरीक व व्यावसायीक मात्र तोंडाला मास्क न लावत असल्याच्या तक्रारी वाढल्याने आता पोलिस व पालिकेचे कर्मचारी हे तोंडाला मास्क नसल्यास त्या व्यक्तीला अथवा विक्रेत्यांना जागेवरच 100 रुपयांचा दंड करून पावती देणार आहेत शिवाय शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये वावरण्यास बंदी करण्यात आली आहे. मास्क न लावणार्‍यांसह रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या
पध्दतीने हातगाड्या लावून उभ्या राहणार्‍यांविरुद्ध देखील कारवाई केली जाणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !