फैजपूर परीसरात समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला


ज्वारीसह कपाशीचा पेरा वाढला : पीकस्थिती समाधानकारक

फैजपूर : फैजपूर शहरासह परीसरात यंदा खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर समाधानकारक पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला आहे तर पीक स्थिती समाधानकारक आहे. यंदा शेतकर्‍यांनी फैजपूर परीसरात ज्वारी पाठोपाठ कपाशी पेरालाही पसंती दिली आहे.

ज्वारीचा पेरा वाढला
फैजपूर शहरासह परीसरात अनेक लोकांचे प्रमुख साधन शेती व्यवसाय आहे. रब्बी हंगाम आल्यानंतर मे महिन्यापासून परीसरात पाण्यावरील कपाशीचा पेरा करण्यात आल्यानंतर परीसरात शेतकरी वर्गाकडून मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण करून सालाबादप्रमाणे खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाने तयारी पूर्ण केली. यानंतर फैजपूर शहर व परीसरात मान्सूनपूर्व पावसाने सरासरी समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या व या भागात यंदा जून महिन्यातच खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर वेळेवर पावसाच्या समाधानकारक हजेरीने पीक स्थिती समाधानकारक आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांनी कोळपणी, निंदणी, ज्वारीची विरवणी असे कामे पूर्ण करून घेतली आहे. यंदा परीसरात ज्वारी पेराला मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात आली असून यापाठोपाठ कपाशी याबरोबर उडीद,मूग यांचाही चांगला पेरा झाला असून पावसाच्या समाधानकारक हजेरीने पाण्याची चातकासारखी वाट पाहणारे पिके डोलू लागली आहेत.

पावसाची साथ मिळाल्यास बळीराजा सुखावणार
पीक स्थिती समाधानकारक असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाची वेळेवर साथ मिळाल्यास बळीराजा खरीप हंगाम घेण्यात कोणतीच कसर सोडणार नाही शिवाय गुरांच्या चार्‍याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असे सद्यस्थितीत तरी चित्र आहे. मे महिन्यात परीसरात पेरा झालेल्या पाण्यावरील कपाशीला मान्सूनपूर्व पावसाचा चांगला फायदा झाला आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने हवालदिल झालेल्या शेतमजूरांच्या हाताला काम मिळत असल्याने शेतमजूरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !