श्री राम मंदिर आधूनिक संस्कृतीचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अयोध्या : गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली असून राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. श्री प्रभू हे राम संस्कृतीचे आधार असून श्री राम मंदिर हे आधूनिक संस्कृतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुधवारी पार पडल्यानंतर त्यांनी देशवासीयांना संबोधीत केले.
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली. पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारीजातकाचं वृक्षारोपण केलं. तर हनुमानगढीत त्याआधी त्यांनी पूजा केली. पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चाराच्या गजरात पूजाविधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

