इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम उद्योगांमुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट


प्रा.दीपक साकळे : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन कार्यक्रम

भुसावळ : कोरोना काळात अनेक व्यवसायांत अडचणी आल्या परंतु इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम क्षेत्रातील व्यवसाय व उद्योग सुरूच राहिले कारण ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत महामारीच्या काळात याच क्षेत्राने एकमेकांशी जुळवून ठेवले. शहरी क्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रांत स्मार्टफोन उपयोग करणार्‍या लोकांची संख्या वेगाने वाढली. 2020 च्या अखेरपर्यंत भारत जगातील चौथा सर्वात मोठी स्मार्टफोन बाजार असणारा देश झाला आहे. अशात या क्षेत्रात रोजगार वाढले आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम तज्ञांना उत्तम पर्याय निर्माण झाले, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सदस्य प्रा.दीपक साकळे यांनी केले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीष कुळकर्णी, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

17 लाख नोकर्‍या मिळणार
2022 च्या मध्यात 17 लाख नोकर्‍या मोबाइल हँडसेट बनविण्यार्‍या कंपन्या वा याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये मिळतील, तथापि सेवा पुरवठादार कंपन्यातही जवळपास 3.5 लाख लोकांना रोजगार मिळेल. या वर्षी सेवा बाजाराचे उत्पन्न वार्षिक 7.2 टक्के या दराने वाढले आहे म्हणून कोरोनासारख्या महाभयंकर रोगराईत सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम उद्योगांमुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट बनली आहे, असेही प्रा.साकळे म्हणाले.

रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य आत्मसात करा : डॉ.गिरीष कुळकर्णी
गेल्या महिन्यात सादर झालेल्या एका अहवालानुसार इंटरनेट डेटा असलेली वाढती मागणी आणि नव्या सेवा पुरवठादारांची संख्या वाढल्याने देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम उद्योगात रोजगाराच्या संधी वाढल्या. 2022 च्या शेवटापर्यंत या क्षेत्रात जवळपास 20 लाख नव्या लोकांना रोजगार मिळेल. पण त्यासाठी आवश्यक शिक्षण व कौशल्य आत्मसात करणे हे विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल असले पाहिजे, असे मत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाचे विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी मांडले.

खासगी क्षेत्रातही अधिक संधी, अधिक पॅकेज
या क्षेत्रातील अधिकांश नोकर्‍या खासगी क्षेत्रातच उपलब्ध आहेत. गेल्या वर्षापासून 56 नवीन मोबाइल उत्पादन प्लांट सुरू झाले आहेत. अशात या क्षेत्रात नोकरीच्या शक्यताही अधिक आहेत. त्यामानाने मिळणारे पॅकेज सुद्धा आकर्षक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग वा याच्याशी संबंधित क्षेत्राच्या व्यावसायिकांची ही या क्षेत्रात मागणी राहील, अशी माहिती कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा.अनंत भिडे यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !