रस्ता अडवणारे हॉकर्स, नंबरप्लेट नसलेले दुचाकीस्वार व बेकायदा बॅनर्स रडारवर
भुसावळात नूतन उपअधीक्षक अॅक्शन मोडकर : आठवडाभरात सुधारणा न केल्यास दाखल होणार गुन्हे
भुसावळ : भुसावळातील गुन्हेगारी तीन महिन्यात थोपवणार असे सांगत पदभार घेतलेले नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे शुक्रवारपासून प्रत्यक्षात अॅक्शन मोडवर आले आहेत. रस्त्यावर बेशिस्तपणे लोटगाड्या लावणारे हॉकर्स, वाहतुकीचे नियम पायतळी तुडवणारे तसेच नंबरप्लेट नसलेले दुचाकीस्वार व बेकायदा रस्त्यांवर लावण्यात येणार्या होर्ग्डिंग्जविरुद्ध त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईचे भुसावळातील व्यापारी वर्गाने स्वागत केले आहे. शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस अष्टभूजा देवी मंदिरापासून वाघचौरे यांनी अधिकार्यांना सोबत पायी फिरत व्यापार्यांसह रस्त्यांवर अतिक्रमण करणार्यांना समज देत आठ दिवसात सुधारणा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
अतिक्रमण धारकांमध्ये उडाली खळबळ
भुसावळातील सर्वाधिक समस्या वाहतुकीची असल्याने उपअधीक्षकांनी शहराची वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी वाघचौरे यांच्यासह शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला व वाहतूक शाखेसह बाजारपेठच्या पोलिस कर्मचार्यांना घेत रस्त्यावरून गस्त सुरू केली आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे लोटगाड्या लावणार्यांना रस्त्यावर लोटगाडी चालकांना तसेच रस्ता अडवणार्या व्यावसायीकांना समज दिली जात असून बेकायदा लावलेले होर्ग्डिंग्ज व बॅनर लागलीच काढण्यात येवून संबंधिताना यापुढे ते न लावण्याबाबत समज दिली जात आहे.
आठ दिवसानंतर गुन्हे दाखल करणार : पोलिस उपअधीक्षक
शहराची वाहतूक सुरळीत करण्यावर आपला भर असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून कागदपत्रे सोबत बाळगावीत तसेच विना नंबरप्लेट असलेल्या सुमारे पाचशे वाहनधारकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. सुरूवातीला रस्ते अडवणार्या हॉकर्स, अतिक्रमण धारकांना समज दिली जात असून आठ दिवसानंतरही संबंधितानी दखल न घेतल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असेही वाघचौरे म्हणाले.

