एस.टी.बसच्या धडकेत अनोळखी पादचार्‍याचा मृत्यू


जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या एस.टी.बसने महामार्गावरुन पायी जाणार्‍या पादचार्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचार्‍याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास रेमंड चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

जागीच पादचार्‍याचा मृत्यू
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव डेपोतील जळगाव-श्रीगोंदा जाणारी बस क्रमांक (एम.एच.11 बी.एल.9385) रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास औरंगाबादकडे जाण्यास निघाली. बस राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असतांना रेमंड चौफुलीजवळ महामार्गावरुन पायी जात असलेल्या एका अनोळखी पादचार्‍याला बसने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
पहाटे सहा वाजेच्या सुमारास रेमंड चौफुलीजवळ बसच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

ओळख पटविण्याचे आवाहन
अपघात झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. दुपारपर्यंत मयताची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांकडून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अपघात झाल्यानंतर बस एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. तसेच बसचालक विशाल गौतम जोगदंड (34, रा. अनगरे ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर) याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !