दहा लाखांसाठी लग्न मोडले : कल्याण पाच जणांविरुद्ध गुन्हा
रावेर : लग्नासाठी दहा लाखांची मागणी करीत साखरपुड्यानंतरही लग्न मोडणार्या कल्याणच्या पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामजीन्सी येथील चरणसिंग सारीचंद्र पवार यांच्या मुलीचा कल्याण येथील सुदर्शन भालचंद्र चव्हाण याच्याशी 3 नोव्हेंबर 201 9 रोजी साखरपुडा झाला होता. त्यावेळी लग्नाची तारीख ठरवली होती. मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सुदर्शन भालचंद्र चव्हाण, भालचंद्र अमरसिंह चव्हाण, रीतेश भालचंद्र चव्हाण, अनिता भालचंद्र चव्हाण (सर्व रा.सुंदर कॉम्प्लेक्स, गौरीपाडा, कल्याण पश्चिम, जि.ठाणे) व नामोबाई राठोड (रा.मालेगाव रोड, चाळीसगाव) यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क साधून लग्नाची तारीख ठरवण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयीत आरोपी 10 लाख रुपये हुंडा द्या तरच आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू असे सांगितले. साखरपुड्यात सुदर्शन चव्हाण याला दिलेले 25 ग्रॅम सोने व साखरपुड्याचा दोन लाख 56 हजार रुपये खर्च परत करावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी चव्हाण कुटुंबियांकडे केली मात्र सोने व खर्च परत देणार नाही, असे म्हणत चव्हाण कुटुंबाने चरणसिंग पवार यांना शिवीगाळ करीत विवाह मोडला. चव्हाण कुटुंबाने फसवणूक केल्याने मुलीचे वडील चरणसिंग पवार यांनी रावेर पोलिसात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

