बोरखेड्यातील हत्याकांडातील पीडीत कुटुंबाला शासनाच्या वतीने मिळाली जागा
आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते सातबारा उतार्याचे वितरण
रावेर : तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील शेतात एकाच कुटुंबातील चौघा भावंडांची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील पीडीत कुटुंबांला शासनातर्फे घरकुलासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते रावेर शिवारातील बक्षीपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात 500 स्केअर फूट जागा देण्यात आली. दरम्यान, 6 रोजी आदिवासी मंत्री के.सी.पाडवी या कुटुंबाची भेट घेणार आहे.
पीडीत कुटुंबाला दिला जागेचा उतारा
राज्याला हादरवून सोडणार्या येथील बोरखेडा हत्याकांडातील पीडीत कुटुंबियांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी रावेर शिवारातील बक्षीपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गट क्रमांक 1241 मधील 500 स्केअर फूट जागा देण्यात आली. या जागेचा सातबारा उतारा पीडीत कुटुंबाला आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते देण्यात आला. प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, गोंडू महाजन, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे, पी.आर.पाटील, डॉ.सुरेश पाटील, गोंडू महाजन यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
इतर योजनेतून देणार लाभ
पीडीत कुटुंबाला घरकुलासाठी जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून या जागेवर शबरी आवास योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून घरकुल बांधून देण्यात येणार आहे. याशिवाय रेशनकार्ड, आधारकार्ड आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली आहे.

