हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला
अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची टिका
मुंबई : काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले असून रीपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करीत असून हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असल्याचे मत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मांडले आहे. ते म्हणाले की, पत्रकारीतेच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे, याचा प्रतिकार केला जाईल, असं शाह यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी केली टिका
आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, आमदार आशिष शेलार यांनीही राज्य सरकारच्या या कृतीवर टिका केली आहे.


कंगणाने केला व्हिडिओ ट्वीट
अर्णब यांच्या अटकेनंतर कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात कंगनाने तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल केला आहे. तिने म्हटलं आहे की, मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?, असा सवाल तिनं केला आहे.