गृहमंत्री म्हणाले, पोलिसांची कृती कायद्यानुसारच !
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रीपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील, असे म्हटले आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.
न्यायालयाच्या आदेशाने केस रीओपन
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रीओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.

