गुन्हेगारी रोखण्यासह जनतेत समन्वय निर्माण करणार : स्वप्नील उनवणे
निंभोरा पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला
खिर्डी (सादीक पिंजारी) : जनतेत समन्वय निर्माण करण्यासह पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असून गुन्हेगारांना मात्र कायद्याची भीती वाटेल, अशाच पद्धत्तीने कार्य करणार असल्याची ग्वाही निंभोरा पोलिस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या बदलीनंतर रीक्त जागी एरंडोल पोलिस ठाण्याहून उनवणे यांची निंभोरा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून उमटवला ठसा
उनवणे यांनी एरंडोल पोलिस ठाण्याची धूरा सांभाळताना कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखत जनतेत समन्वय ठेवण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली. सर्वसामान्य नागरीकांमध्ये पोलिस दलाविषयी आदर निर्माण करण्यासह व्यापारी वर्गालाही त्यांनी आश्वस्त करून गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणावर आळा बसवला. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारदाराला सन्मानाची वागणूक देवून त्याची तक्रार सोडवण्यासाठी उनवणे हे नेहमीच प्रयत्नशील राहिल्याने अल्पावधीत ते एरंडोलकरांच्या गळ्यातील ताईतही ठरले होते. चोर्या-घरफोड्यांना आळा घालण्यासाठी रात्रीची प्रभावी गस्त तसेच अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिस दलाचे कसोशीने प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले. निंभोरा पोलिस ठाण्यात त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर सहकार्यांतर्फे त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या.

