यावलमध्ये बेकायदा वाळू वाहतूक : एकाविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळुची चोरटी वाहतूक सुरू असून यावल पोलिसांनी पंधरा दिवसांच्या कालावधीत पुन्हा दुसर्यांदा वाळू वाहतूक करणारे डंपर पकडत गुन्हा दाखल केला आहे. यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर गस्तीवर असलेल्या यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नितीन चव्हाण यांनी डंपर (एम.एच.19 सी.वाय.8181) या क्रमांकाच्या डंपरला अडवत कागदपत्रांची विचारणा केली असता या वाहनातून बेकायदा वाळूची वाहतूक हात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी डंपर चालक बाशन युवराज कोळी (25, डांभुर्णी, ता. यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील भोगे, राहुल चौधरी यांनी करीत पाच लाख रुपये किंमतीच्या डंपरसह वाळू जप्त केली आहे.

