यावलमधील शेतकर्‍यांच्या फसवणूक प्रकरणी दोघा व्यापार्‍यांना अटक


यावल : शहरातील सहा आणि तालुक्यातील दोन शेतकर्‍यांची केळी खरेदी करून 13 लाख 65 हजार रुपयात फसवणूक करणार्‍या त्या दोघा व्यापार्‍यांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष कांतीलाल पाटील व रवींद्र ओंकार सपकाळे अशी अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींना न्यायालयाने 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यावल पोलिसात दाखल होता गुन्हा
14 सप्टेंबर 2020 रोजी यावल पोलिसात डॉ.गणेश लक्ष्मण रावते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या टाकरखेडे शिवारामधे शेत गट क्रमांक 24 मधील रावेर येथील दत्तगुरु केला एजन्सी मालक केळीचे व्यापारी सुभाष कांतीलाल पाटील (रा.पुनखेडे, ता.रावेर, ह.मु.भगवतीनगर, जुना सावदा रोड) व त्यांच्यासोबत असलेले गणेश केला ग्रुप सांगवी खुर्द, ता.यावलचे रवींद्र ओंकार सपकाळे या दोन्ही केळी व्यापार्‍यांनी तीन लाख सात हजार 961 रुपयांची केळी विकत घेतली होती तसेच देवनाथ भावसिंग पाटील, अरुणकुमार सुपर खेडकर, पराग विजय सराफ, संदीप सतीश वायकोळे, संभाजी काशिनाथ लावणे, तालुक्यातील नावरे येथील देविदास उदयसिंग पाटील, महेंद्र शिवाजी पाटील अशाप्रकारे एकूण आठ शेतकर्‍यांची 13 लाख 65 हजार 842 रुपयाची केळी या दोघा व्यापार्‍यांनी विकत घेतली होती मात्र पैसे देण्यात टाळाटाळ केली. शेतकर्‍यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर दोघा व्यापार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रवींद्र सपकाळे याला 31 ऑक्टोंबर रोजी तर सुभाष पाटील याला बुधवारी पहाटे सापळा रचुन पोलिसांनी अटक केली व त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 9 नाव्हेंबर पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !