समारंभांना 500 जणांच्या उपस्थितीची परवानगी द्या
भुसावळातील मंडप चालकांची प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : कोरोनामुळे टेंट व्यवसायीकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत शासनाने तत्काळ सार्वजनिक कार्यक्रम, लग्न व अन्य कार्यक्रमांसाठी 500 जणांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, अशी मागणी भुसावळ टेंन्ट हाऊस व डेकोरेटर्स ओनर्स असोसिशनने केली. काळ्या फिती व काळे मास्क लावून टेंट चालकांनी लक्ष वेधले. तोंडावर काळे मास्क व काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा मूक निषेध करण्यात आला.
500 जणांच्या उपस्थितीला द्यावी परवानगी
कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी सार्वजनिक व विविध कार्यक्रमांवर नियंत्रण आले. यामुळे केवळ 50 जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत. यामुळे टेंन्ट, कॅटरींग, मंगल कार्यालय, बॅँक्वेट हॉल, डीजे साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक आदी सेवा देणारे व्यावसायीक प्रभावीत झाले आहेत. यामुळे लग्न, मंगल कार्यालये, सामजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांमध्ये 500 जणांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी टेंन्ट चालकांनी प्रशासनाला निवेदन दिले. सध्या अनलॉकच्या काळातही किती नुकसान होत आहे, याबाबतची समस्या व्यावसायीकांनी मांडली. आधीच अडचणीत असलेल्या व्यावसायीकांची समस्या सोडवावी, अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर भालेराव, किरण मिस्त्री, दिनेश राणे, संजय चौधरी, संदीप चौधरी, नानक जैन, अशोक चेलाणी, स्वप्नील साबळे, अनिल मामा, बंडू पाटील, संजय लाहोटी, किशोर ढाके आदींसह टेंट चालकांकडे काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

