राष्ट्रीय डाक सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान
भुसावळ : राष्ट्रीय डाक सप्ताहाचे औचित्य साधून कोविड कालावधीत उत्कृष्ट काम करणार्या भुसावळ विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. सप्ताहभरात वृक्षारोपण, कर्मचार्यांशी संवाद, ग्राहकांचा सन्मान, कर्मचार्यांचे समुपदेशन, अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव असे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अधिकारी व कर्मचार्यांच्या गौरव समारंभ अध्यक्षस्थानी भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी.बी.सेलूकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोस्ट फोरमचे सदस्य डॉ.जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डाक अधीक्षक एस.एस.म्हस्के, निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ पोस्ट मास्तर एजाज शेख, कार्यालय सहायक राकेश पाटील उपस्थित होते. राकेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत भुसावळ पोस्ट विभागातर्फे केलेल्या विविधांगी उल्लेखनीय कार्याचे कथन केले. अधीक्षक पी.बी.सेलूकर व प्रमुख अतिथी डॉ.जगदीश पाटील यांच्या हस्ते सहा.डाक अधीक्षक शीतल म्हस्के (भुसावळ), डाक निरीक्षक प्रशांत मालकर (यावल), भुसावळ उपविभागाचे निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ हेड ऑफिसचे पोस्टमन आकाश राठोड, पोस्टमन शरीफ पटेल, कार्यालयीन सहाय्यक अमोल सुभाष नेहेते, अविनाश श्रीराम चौधरी आदींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याप्रमाणे ज्येष्ठ ग्राहकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.जगदीश पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, संकटाच्या कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कार्याची वरिष्ठ कार्यालयाने घेतली दखल ही अभिमानास्पद आहे. अध्यक्षीय मनोगतात पी.बी.सेलूकर यांनी भुसावळ विभागात भुसावळसह जामनेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यातील सुमारे 35 कार्यालय आणि 600 कर्मचार्यांच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राकेश पाटील यांनी मानले.

