यावल तालुक्यात स्वच्छता अभियानाचा बट्ट्याबोळ
शासन निधीचा दुरूपयोग : आरपीआय युवा जिल्हा कार्याध्यक्षांची तक्रार
यावल : यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचा बट्याबोळ झाला असून शासनाला मिळालेल्या अनुदानाचा मोठया प्रमाणावर दुरूपयोग करण्यात आल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे.
थातूर-मातूर कामे करीत लाटली बिले
संपूर्ण देशासह राज्यात स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधीही गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधणीसाठी देण्यात आला मात्र तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही स्वच्छता योजना राबवितांना सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसून पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी, ठेकेदार, शाखा अभियंता यांनी तालुक्यात विविध ग्रामपंचायतीच्या परीसरात गाव पातळीवर ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची थातुर-मातुर व अपुर्ण कामे करून ती कागदोपत्री पुर्ण दाखवुन पुर्ण बिले काढण्यात आले असल्याची तक्रारीत म्हटले आहे. या योजनेची काही कामांचे आदेश मिळण्यासाठी काही अधिकारी यांनी आपल्या मर्जीतील मते दाखल करून कामे सुरू केली आहे. दरम्यान, अशा कामांच्या मान्यता मिळवुन घेण्यासाठी शाखा अभियंत्यांपासून जिल्हा परीषदेच्या वरीष्ठांपर्यंत आर्थिक देवाण-घेवाण करून खोटी बिले तयार करीत असल्याचे म्हटले आहे.
14 व्या वित्त आयोगाच्या निधीतही गैरव्यवहार
यावल तालुक्यातीत मांगीकरंजी, लिघुरी, वढोदा, अट्रावल, भालोद, मायसांगवी, निमगाव, डोंगरकठोरा, हंबर्डी, बोरखेडा बु.॥, खुर्द, चिखली बु.॥, चिखली खु.॥, मनवेल, बोरावल, टाकरखेडा, थोरगव्हाण, चुंचाळे या ग्रामपंचायतींमधील कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची कामे अपूर्ण अवस्थेत सोडलेली आहेत. कामांची बिले मात्र ठेकेदारांनी काढुन घेतलेली असून अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर करणार्या ठेकेदारांकडून बिले वसुल करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी संगनमताने 14 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त झालेल्या निधीचादेखील गैरवापर झाला आहे. शासनाच्या निधीसह 20 टक्के ग्रामपंचायत निधीमध्येही बोगस बिले दाखवुन मोठया प्रमाणावर आर्थिक घोटाळे केलेले या सर्व भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करून संबंधीतांवर योग्य प्रकारे कारवाई न झाल्यास रीपाइंच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल व प्रसंगी न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा ईशारा रीपाइंचे अशोक तायडे, जिल्हा रोजगार आघाडीचे युवराज सोनवणे, रीपाइंचे युवा शाखाध्यक्ष संजय तायडे, रीपाइंचे तालुका उपाध्यक्ष भीमराव गजरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

