बोरखेडा हत्याकांडांची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करणार
आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी : रावेरात पीडीत कुटुंबाची घेतली भेट
रावेर : तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडीत कुटुंबाची शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी रावेरात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. आदिवासी मंत्री पाडवी यांनी पीडित कुटुंबीयांकडून आदिवासी भाषेमध्ये माहिती जाणून घेत ही घटना अत्यंत क्रूर आणि गंभीर असल्याचे सांगत ही घटना घडण्यामागचे मूळ कारण शोधण्यसाठी तज्ज्ञ समिती नेमणार येणार असल्याचे सांगत त्यात मानसोपचार तज्ञ असतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. या कुटुंबाला शासनातर्फे आधीच दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आलेला असून घर बांधण्यासाठी जागा देण्यात आली असून जातीचा दाखला, रेशनकार्ड दिलेले आहेत. परीवारातील सदस्यांनी पीडितांनी मुलगा संजय याला नोकरी आणि शेत जमीन शासनाकडून मिळावी, अशी मागणी केली असता आदिवासी विकास मंत्री यांनी त्यासंदर्भात सुद्धा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी अशोक कडलग, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, राष्ट्रवादीचे सोपान पाटील, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संतोष पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
आश्रमशाळा संघटनेचे निवेदन
दरम्यान, अनुदानित आश्रम शाळा कर्मचार्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार नाही तसेच विविध आश्रमशाळा संघटनेचे निवेदन आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना देण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, सुधाकर झोपे, मनोज पाटील आदींनी निवेदन दिले.

