यावलचे नगरसेवक शेख अस्लम यांच्या अपात्रतेस स्थगिती
यावल : यावल नगरपालिकेचे नगरसेवक शेख अस्लम शेेख नबी यांच्या अपात्रतेस नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहेे. अपात्रतेप्रकरणी अपिलावर जोवर सुनावणी होत नाही तोवर ते पदावर पुन्हा कायम राहतील, असा अपात्रतेवर स्थगिती आदेश शुक्रवारी काढण्यात आल्याने तब्बल नऊ महिन्यांनी शेख पुन्हा पदावर आले आहेत. माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांनी काँग्रेसचे नगरसेवक शेख अस्लम शेख नबी यांच्या विरुद्ध 26 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नगरसेवक शेख यांच्या पत्नी शाहिस्ता परवीन यांना त्यांच्या प्लॉटमध्ये 69 चौरस मीटर बांधकामाची परवानगी एप्रिल 2016 मध्ये पालिकेकडून घेतली. मात्र त्या जागेवर पतीच्या नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून त्यांनी अंदाजे 145 चौरस मीटर बांधकाम केले. त्यामुळे पदाचा दुरुपयोग करून नकाशापेक्षा जास्त बांधकाम केले म्हणून शेख यांच्यावर नगरपालिका कायद्यान्वये अपात्र करण्यात यावेे, अशी तक्रार झाली. 28 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकार्यांनी निकाल जाहीर करून शेख अस्लम यांना अपात्र ठरवले होते. या प्रकरणी शेख यांनी निकालांविरुद्ध नगर विकास मंत्रालयात अपील दाखल केले. शुक्रवारी अपील मंजूर करण्यात येऊन पुढील सुनावण्या पूर्ण होतील तो पर्यंत शेख यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली. सत्ताधारी गटाचे गटनेता अतुल पाटील, मुबारक तडवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक समीर मोमीन, गणेश महाजन, राजेंद्र फालक आदींनी शेख यांचे पालिकेत स्वागत केले.

