जिल्हा परीषदेवरील 10 रोजीचे बोंबाबोंब आंदोलन यशस्वी करा
कॉ.अमृतराव महाजन : बोदवडला ग्रामपंचायत कर्मचारी मेळाव्यात आवाहन
बोदवड : 10 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा परीषदेवर ग्रामपंचायत कर्मचार्यांचा विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब मोर्चा असून तो यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य महासंघाचे सह सचिव कॉ.अमृतराव महाजन यांनी येथे केले. बोदवडमधील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष खरे होते. या मेळाव्यात तालुक्यातील कर्मचार्यांनी आपल्या थकीत पगाराच्या व ग्रामपंचायत राहणीमान भत्ता लागू करत नसल्याच्या तक्रारी केल्या.
या मागण्यांसाठी आंदोलन
थकीत पगार मिळावा, भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा भरणा करावा तसेच कोरोना योद्धा ग्रामपंचायत कर्मचार्यांना थकित प्रोत्साहन भत्ता मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी जि.प.वर 10 रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, बोदवड येथील मेळाव्याला तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी आभार मानले
11 रोजी उपोषण
या मेळाव्याला उखर्डू ढिवरे, योगेश माळी, मधुकर जंगले, अर्जुन शिवाजी मालठाणे, रवींद्र पाटील, प्रवीण ठाकरे, योगेश केणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर ग्रामपंचायत पंचायत समितीचे काळे व कृषी विस्ताराधिकारी कचौधरी यांना कर्मचार्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मेळाव्यात नाडगाव येथील रवींद्र पाटील हे थकीत पगार व खात्यावर भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा होण्यासाठी बोदवड पंचायतसमिती समोर 11 नोव्हेंबरपासून उपोषणास बसणार असल्याने त्यांना तालुक्यातील कर्मचार्यांनी पाठिंबा यावेळी दर्शवला.

