भुसावळात प्रवासी भरण्यावरून रीक्षा चालकास मारहाण
भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळील रीक्षा स्टॉपवरील घटना : दगड मारल्याने रीक्षा डाव हात झाला फ्रॅक्चर
भुसावळ : शहरात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. एका-मागून एक अप्रिय घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांनी आता गुन्हेगारांवर कायद्याचा दांडपट्टा फिरवण्याची गरज निर्माण झाली आहे. रीक्षात प्रवासी भरण्याच्या कारणावरून दोन रीक्षा चालकांमध्ये वाद उफाळल्याने एकाने थेट दगडच हातावर मारून फेकल्याने रीक्षा चालकाचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळील रीक्षा स्टॉपवर शनिवारी सकाळी 11 वाजता घडली.
शहर पोलिसात एका रीक्षा चालकाविरुद्ध गुन्हा
रीक्षा चालक दिलीप रघुनाथ कोळी (मोरेश्वर नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी 11 वाजता लोणारी समाज मंगल कार्यालयासमोरील रीक्षा स्टॉपवरून रीक्षात प्रवास भरल्यानंतर संशयीत आरोपी तथा रीक्षा चालक विजय वाघ (पूर्ण नाव नाही) यांनी प्रवासी घेवून जाण्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच रस्त्यावर पडलेला दगड मारून फेकल्याने कोळी यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी आरोपी वाघ विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास हवालदार मो.अली सैय्यद करीत करीत आहेत. दरम्यान, जखमी कोळी यांच्यावर डॉ.निलेश महाजन यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

