भुसावळात धूम स्टाईलने विवाहितेचे मंगळसूत्र लंपास
भुसावळ : शहरातील माणकबाग परीसरातील विवाहितेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माणकबाग परीसरातील शशिकला वाघुळदे शुक्रवारी दुपारी पायी घराकडे जात असताना गणेश अपार्टमेंटच्या फलकाजवळ दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे व 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून लांबवले. दोन्ही भामट्यांनी हेल्मेट घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर दोघे भामटे भरधाव वेगाने पसार झाले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी पाहणी केली. सहायक फौजदार संजय कंखरे, मोहन पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, धूमस्टाईल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माणकबाग परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली आहे. त्या माध्यमातून भामट्यांनी वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

