भुसावळात गोळीबाराच्या पडताळणीत उधळला दरोड्याचा डाव
भुसावळ शहर पोलिसांची कामगिरी : दोघे आरोपी जाळ्यात, चौघे पसार : आरपीडी रस्त्यावर होता लुटीचा बेत
भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर अधिकार्यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र रात्री उशिरापर्यंत गोळीबार झालेले ठिकाण व संशयीत गवसत नसतानाच संशयास्पद हालचाली करणारे तरुण पोलिसांच्या नजरेस पडताच त्यांना अडवून त्यांची चौकशी सुरू असतानाच चौघांनी पळ काढल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने दोघांना ताब्यात घेताच त्यांची विचारपूस करताच त्यांनी दरोड्याचा प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून लोखंडी चाकू व फायटर जप्त केले आहे. दरम्यान, पसार आरोपींच्या अटकेनंतर गोळीबार झाला वा नाही? याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
गोळीबाराची अफवा अन् पोलिसांची पळापळ !
रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील आरपीडी रस्त्यावर गोळीबार झाल्याची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते थेट कंडारीपर्यंत पोलिसांनी सर्वत्र घटनेची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सतर्कता म्हणून शहरातील खाजगी रुग्णांलयांसह गोदावरी रुग्णालयाशी संपर्क साधून एखादा जखमी उपचारार्थ आला काय? याबाबत विचारणा केली मात्र तसे काहीही घडले नसल्याचे निष्पन्न झाले.
संशयास्पद हालचालींमुळे उधळला दरोड्याचा डाव
गोळीबाराची पडताळणी सुरू असतानाच आरपीडी रोडवरील ख्रिश्चन कब्रस्थानाजवळ काही तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी तरुणांना हटकले असता सहा पैकी चौघांनी पळ काढला तर उर्वरीत दोघांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी दरोड्याच्या तयारीने आल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक वाघचौरे व निरीक्षक ठोंबे यांनी आरोपींची शहर पोलिस ठाण्यात चौकशी केल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत चाकू व फायटर आढळल्याने ते जप्त करण्यात आले. य प्रकरणी कॉन्स्टेबल सोपान पंडित पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी पवन रामु सोनवणे (24), राकेश अशोक बाविस्कर (19, दोन्ही रा.महात्मा फुले नगर, भुसावळ), भारत वाकेकर (भुसावळ) व त्याच्यासोबतचे अन्य तीन अनोळखी मित्र यांच्याविरुद्ध भादंवि 399, 401, 402 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत. पवन व राकेश बाविस्कर यांना अटक करण्यात आली आहे.
पसार आरोपींच्या अटकेनंतर गोळीबाराचा उलगडा
दरोड्याच्या गुन्ह्यात भारत वाकेकरसह अन्य तीन अनोळखी संशयीत पसार झाले असून त्यांच्या अटकेनंतर आरपीडी रस्त्यावर फायरींग झाले वा नाही तसेच आरोपींकडे गावठी कट्टा होता वा नाही ? याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी दिली.

