हिरकणी महिला मंचमुळे महिलांना आधार मिळेल


अ‍ॅड.भारती मुजुमदार : आर्या फाऊंडेशन संचलित हिरकणी महिला मंचचा उद्घाटन समारंभ

भुसावळ : समाजात व्यसनाधीनता वाढली आहे. यामुळे विविध गुन्हे घडत असून महिलांवरदेखील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या अत्याचारांना कमी करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत असले तरी समाजातील विविध संघटनांनी पुढाकार घेऊन महिलांना आधार दिला पाहिजे यासाठी महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे तसेच स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत झाली पाहिजे. या अत्याचारामागील कारणेदेखील समजून घेणे गरजेचे आहे यासाठी महिलांमधेदेखील जागृकता निर्माण करून त्यांना खंबीर बनवत त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर टाकली पाहिजे तसेच अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिल्यास या घटना टाळता येवू शकतात. यासाठीच हिरकणी महिला मंच मुळे अशा असह्य महिलांना आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.भारती मुजुमदार यांनी केले.

यांची होती उपस्थिती
आर्या फाऊंडेशन संचलित हिरकणी महिला मंचचा उद्घाटन समारंभ नुकताच भुसावळातील पांडूरंग टॉकीज मागील बालाजी मंदिराजवळ झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.भारती मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीच्या प्रा.रश्मी शर्मा आर्या फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे, सचिव लता तायडे, राजेश्री सुरवाडे तसेच आर्या फाऊंडेशनच्या मार्गदर्शक सुपडा तायडे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्या फाऊंडेशनच्या संचालिका तथा अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य प्रा.मनीषा बाविस्कर यांनी केले. यावेळी त्यांनी हिरकणी महिला मंच म्हणजे नेमकं काय त्याचे कार्य या मंचाचे महिलांना का गरज आहे ? हे समजावून सांगितले.

सामाजिक कर्तव्य भावनेतून पाहिले पाहिजे
रोटरीच्या रश्मी शर्मा म्हणाल्या की, आजची प्रत्येक महिलाही परफेक्ट हिरकणी आहे त्यांना फक्त त्यांच्यातील त्या गुणांची ओळख करून देणे गरजेचे आहे. संसार कुटुंब सांभाळात असताना स्वत:चे छंद, आवड निवड जपली पाहिजे तसेच एका महिलेचे दुसर्‍या महिलेविषयी आपुलकी प्रेम ठेवले पाहिजे. यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन चुकीच्या घडणार्‍या घटनाना निश्चीतपणे आळा घालता येवू शकेल. सर्वांनी आपले सामाजीक कर्तव्य या भावनेतून याकडे बघितले पाहिजे.

समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ
आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून आर्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत व्यासनमुक्ती अभियान राबवत आहे. हे राबवत असताना ग्रामीण भागात व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेले अनेक परीवार पहावयास मिळाले. या कुटुंबातील विधवा घटस्फोटीत महिलांना परीवार चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गटाला समाजाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्या व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हिरकणी महिला मंच हे व्यासपीठ आहे. यावेळी हिरकणी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे यामध्ये अध्यक्ष प्रा.निरंजना तायडे, उपाध्यक्ष- सुवर्णा इंगळे, अ‍ॅड.मनीषा बाविस्कर, डॉ.वंदना तायडे, पौर्णिमा मसाने, सरोजिनी रामटेके, बबीता सिंग, अंजुम खान, विजय मोदी, मोनिका डॅनियल, मालती येवले, सुरेखा साळुंखे यांची निवड करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !